प्राण्यांचा जीवनक्रम

माहीत आहे का तुम्हांला?

views

03:42
घरी तुमची आई धान्याची साठवण करीत असताना धान्य वाळविते. हे तुम्ही पाहिले असेल. ज्या डब्यात धान्य भरावयाचे आहे तो डबा स्वच्छ धुवून, सुकवून, कोरडा करून त्यात स्वच्छ निवडलेले धान्य भरून ठेवते. त्याचे झाकणही अगदी व्यवस्थित लावून ठेवते. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात कधीकधी अळ्या, जाळ्या, किडे झालेले दिसतात. असे कसे होत असेल? यामध्ये किडे, अळ्या कोठून आल्या असतील? असे प्रश्न तुम्हांला पडले असतील. हो की नाही? तर आता आपण या प्रश्नांची उत्तरे शोधूया. मुलांनो, धान्य साठवण्याची गोदामे, वाण्याच्या दुकानात किंवा आपल्या घरात अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. अशा कीटकांच्या माद्यांनी त्या धान्यात अंडी घातली असू शकतात. परंतु ती अंडी आपल्याला दिसत नाहीत. म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. आपण ज्या डब्यात धान्य साठवलेले असते, त्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. त्यांच्याही अंडी, सुरवंट (अळी), कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण ज्या वेळी डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात, त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. अंडी, अळी, जाळी किंवा पूर्ण वाढ झालेले कीटक अशा अवस्थेत ते आपल्याला पाहायला मिळतात.