साठवण पाण्याची

जुने जलसाठे

views

03:42
आता आपण पाणी साठवण्याच्या विविध पद्धती पाहू. पूर्वीच्या काळात पाणी साठवून ठेवण्याच्या अनेक पद्धती होत्या. आजच्या काळात त्यांचा फारसा वापर होत नाही. परंतु त्यांचे पडिक स्वरूपातील अवशेष सर्व भागांत पाहायला मिळतात. त्यांतील काही खूप संदर आहेत. यातील काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही. त्यातील काही पद्धती आपण पाहणार आहोत. तुम्ही विहीर प्रत्यक्ष पाहिली असेल. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात विहिरी पाहायला मिळतात. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी मिळवण्यासाठी विहिरी खणल्या जातात. रुंद असा ७ ते ८ फुटाचा गोलाकार खड्डा खणला जातो. त्या खड्यात जमिनीतील झऱ्यांमार्फत पाणी साठते. हे पाणी प्रामुख्याने गावातील पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरले जाते. तसेच शेतातही अशी विहीर खणून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. आपण शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले बघितले तर ते डोंगरात, उंचावर असायचे. अशा ठिकाणी पायथ्याकडून माथ्याकडे पाणी नेणे म्हणजे अशक्यच होते. म्हणून महाराजांनी गडावरतीच पाण्याच्या बांधीव टाक्या व तलाव बांधून घेतले. या तलावात पावसाचे पाणी साठत असे, तसेच टाक्यांतही पाणी असे. हे पाणी पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवत असे. आजही शिवनेरीसारख्या गडावर असे तलाव पाहायला मिळतात. विहिरीसारखाच परंतु आकाराने, घेर कमी असलेला खड्डा म्हणजे आड होय. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. पाणी काढण्यासाठी दोरीला भांडे बांधत असत. त्याला पोहरा म्हणत. ते भांडे आडात टाकून त्यातून पाणी काढले जायचे. जुन्या मराठी चित्रपटांत असे आड पाहायला मिळतात. सांगली जिल्ह्यात ‘आटपाडी’ नावाचे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात 'आड' होते. या आडांना वर्षभर पाणी असायचे. पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले. त्यानंतर आडांचा वापर बंद झाला. ते दगड, मातीने बुजवले गेले. आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत. अनेक गावांमध्ये असेच झाले आहे. नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात. त्यामुळे साठलेले पाणी जमिनीत मुरते व आसपासच्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. तसेच हे पाणी शेतीसाठी व जनावरांना पिण्यासाठी वापरता येते. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा त्या प्रदेशातून एखादी मोठी नदी वाहत नसेल तर अशा प्रदेशात पूर्वी पाण्याची गरज भागविण्यासाठी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. या तलावातील पाण्यावरच त्या प्रदेशातील लोकांना वर्ष काढावे लागे. पूर्वीच्या काळात पाणी साठविण्यासाठी हौद वापरले जायचे. हे हौद चारही बाजूनी बांधलेले असायचे. यांची रुंदी व खोली जास्त असे. हे हौद प्रामुख्याने जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये अढळतात. उदा. औरंगाबाद. अशा हौदातील पाण्याचा आजही वापर काही ठिकाणी केला जात आहे. अशा तऱ्हेने पूर्वीच्या काळी पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग केला जात असे.