प्रतापगडावरील पराक्रम

प्रस्तावना आदिलशाही हादरली

views

02:19
शिवरायांनी परकीय शत्रूंबरोबरच आपल्यातील काही शत्रूंचाही बंदोबस्त केला. वाईच्या मोरेंचा पराभव करून त्यांनी रायगडासारखा मोठा किल्ला, अफाट सैन्य नि संपत्ती मिळविली होती. शिवरायांच्या या वाढत्या हालचालींमुळे आदिलशाही दरबारात काळजी वाटू लागली होती. या शिवाजीचा आता बंदोबस्त केला पाहिजे असे आदिलशाहाला वाटू लागले. शिवरायांच्या वाढत्या हालचालींमुळे दरबारातील प्रत्येकजण काळजीत पडला. दरबारात आदिलशाहीतील सर्व सरदार गोळा झाले. त्यातील एकेक तर गाजलेले समशेरबहाददर होते. त्यांच्या तलवारीपुढे शत्रू उभाही राहू शकत नव्हता, असे लोक तेथे हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण तिथे स्वत: हजर होती. मुलांनो, बडी साहेबीण म्हणजे आदिलशाहाची आई. कारण प्रश्नच तेवढा महत्त्वाचा होता. कोणता प्रश्न होता? तर शिवाजीचा बीमोड कसा करायचा? शिवाजीला कसा संपावायचा? त्याच्या हालचाली कशा थांबवायच्या ? बडी साहेबीण हिने दरबारातील सर्व सरदारांना सरळ प्रश्न विचारला, ‘’सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?’’ बडया साहेबिणीच्या या प्रश्नावर सर्व दरबारात शांतता पसरली. कोणी काही बोलेना. एवढा मोठा दरबार, त्यातील मोठे-मोठे पराक्रमी, धाडसी, समशेरबहाद्दर सरदार, पण जो तो आपल्या जागी गपचूप बसलेला. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढयात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते, अफजलखान – अफजलखान हा उंच व दणकट शरीर असणारा सरदार होता. आदिलशाही दरबारातील तो सर्वात पराक्रमी सरदार होता.