पिण्याचे पाणी

सूक्ष्मजीव

views

3:49
सूक्ष्मजीव कसे असतात ते पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करू. या प्रयोगासाठी आपण कणभर दही किंवा थेंबभर ताक घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवू. ती पट्टी आता सूक्ष्मदर्शीतून पाहू. त्यात आपल्याला सूक्ष्म आकाराचे सजीव दिसत आहेत. सूक्ष्मदर्शीमधून आपल्याला सूक्ष्म वस्तू पाहता येतात. सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकाराच्या, आपल्या डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत किंवा काचेच्या भिंगातूनही दिसणार नाहीत इतक्या लहान होय. सूक्ष्मजीव म्हणजे आकाराने सूक्ष्म असणारे सजीव. तर असे सूक्ष्मजीव आपल्याला ताकात किंवा दह्यात दिसतात. हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात. ते आपल्याला उपयोगी असतात. पण काही सूक्ष्मजीव शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात. अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव म्हणतात. आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. ते मातीत, हवेत, पाण्यात, खडकांवर कुठेही असू शकतात. अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी ते डोळ्यांना दिसत नाहीत. असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक दिसले, तरी ते पिण्यासाठी निर्धोक असणार नाही. पावसाळ्यात हवेत, मातीत, खडकांवर असलेले असे सूक्ष्मजीव पावसाच्या पाण्यात मिसळतात. असे पाणी आपण प्यायल्यास हगवण किंवा गॅस्ट्रोसारख्या रोगांची लागण होते. अशा वेळी पाणी निर्धोक करण्यासाठी निवळून, गाळून, आणि उकळून घ्यावे लागते. पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो. असे मृत सूक्ष्मजीव जरी आपल्या शरीरात गेले तरी त्यांचा आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही.