मोलाचे अन्न

माहीत आहे का तुम्हांला

views

4:24
पूर्वी यंत्रे नव्हती. त्यावेळी मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करत. आजही काही दुर्गम भागात जिथे यंत्रे नेणे शक्य नसते. अशा ठिकाणी बैलांचा उपयोग केला जातो. त्यासाठी शेतात एक गोल जागा तयार करतात. त्याला खळे म्हणतात. त्या खळ्याच्या मधोमध एक खुंटा जमिनीत उभा करतात. त्याला बैल बांधतात. बैल त्या खुंटयाभोवती गोल गोल फिरतो. त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचून ठेवतात. बैल कणसावर फिरायला लागला, की त्याच्या वजनामुळे कणसाचे दाणे वेगळे होतात. पिक जास्त असले तर मोठे खळे तयार करतात. एका वेळी एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त बैल लावून मळणी केली जाते. मळणीचे काम अनेक दिवस चालते. हे काम बैलांसाठीही कष्टाचेच असते. कारण त्यांना दिवसभर त्या खुंटयाभोवती मळणी संपेपर्यंत फिरावे लागते. पूर्वीच्या मळणीची माहिती घेतल्यानंतर आता आपण परत अर्जुनच्या आईच्या भाकरीच्या गोष्टीकडे वळू. अर्जुनची आई पुढे सांगते, मळणीनंतर उफणणी केल्यानंतर मिळालेले जे स्वच्छ धान्य असते. ते पोत्यात भरून ठेवतात. त्या धान्याला कीड लागू नये, त्याची उंदीर, घुशींनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते. ते धान्य उन्हात घालून व्यवस्थित वाळविले जाते. म्हणजे त्यात किडे होणार नाहीत. तसेच त्यात कडूलिंबाचा पालाही टाकला जातो. त्या धान्याला घुशी, उंदीर लागू नये म्हणून त्यांची योग्य ठिकाणी साठवणूक केली जाते. घरातील आवश्यक तेवढे धान्य ठेवतात. आणि उरलेली पोती गाडीत भरून बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात. तेथे व्यापारी हे धान्य शेतकऱ्याकडून विकत घेतात. त्यावेळी शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात. शिंगाडे आणि मकाणे असे खाण्यात येणारे दोन पदार्थ आहेत. हे दोन पदार्थ गोडया पाण्यात विशिष्ट प्रकारच्या दोन वनस्पतींपासून मिळतात. ते गोळा करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी, वाळवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीसाठी अनेक जणांना श्रम करावे लागते. आपण भाकरीच्या गोष्टीतून भाकरी आपल्या ताटात येईपर्यंत काय काय करावे लागते ते पाहिले. आता आपण आपल्या आहारात येणाऱ्या इतर अन्नपदार्थांसाठी काय कष्ट करावे लागते व ते कोठून येतात ते पाहाणार आहोत. मुलांनो तुम्हांला मासे, मासळी माहिती असेलच. ही मासळी आपल्याला पाण्यातून मिळते. ती मिळविण्यासाठी कोळी समाजातील लोक कष्ट करतात. आदिवासी किंवा भटक्या जमातीतील काही लोक जंगलांमध्ये मिळणारी आवळा, जांभळे, करवंदे, बोरे अशी फळे गोळा करतात आणि विकतात. काही लोक म्हणजे शेतकरी भाजीपाल्यांचे मळे पिकवतात. तर काही लोकांच्या फळांच्या बागा असतात. काही लोक कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळतात. तर काही लोक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांसारख्या पशुपालनाचे व्यवसायही करतात. मुलांनो हे सर्व लोक आपला व्यवसाय चालविण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या प्रयत्नांतूनच आपल्याला विविध प्रकारचे अन्नपदार्थ मिळत असतात. उदा. मासे, भाज्या, फळे, अंडी, मांस यांसारखे पदार्थ आपल्याला त्यांच्यामुळे मिळत असतात. त्यांची साठवण, वाहतूक व विक्री करणे, तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यांत अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत उपयोगी पडते. त्यावर खूप खर्चही होतो. पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या दूध या अन्नपदार्थाचे उदाहरण आपण घेऊ. जनावरांपासून दूध मिळाल्यानंतर ते दूध संकलन केंद्रावर एकत्रित केले जाते तेथून ते वाहतूक करून शहरात आणले जाते. त्याचे पाश्र्चरीकरण करून ते टिकेल अशी काळजी घेऊन त्याठिकाणी ते विकले जाते. तर काही दूध हे दुधापासून विविध पदार्थ बनविले जाणाऱ्या दुग्धोत्पादन केंद्रात नेले जाते. त्यापासून श्रीखंड, आम्रखंड, दही, तूप, लोणी, पनीर असे पदार्थ तयार केले जातात. हे सर्व करताना त्यासाठी अनेक लोक श्रम करीत असतात. त्यावर खर्चही मोठया प्रमाणात होतो. एवढे श्रम व खर्च केल्यानंतरच आपल्याला अन्न मिळते. म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे जरुरीचे आहे.