छोटे आजार, घरगुती उपचार

घरगुती उपचार

views

2:45
चटकन बरे होणारे आजार असतील तर ते घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. सखूच्या आईने सखूचा घसा दुखत असताना तिला गरम पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितल्यानंतर दोन दिवसांत गुळण्या केल्याने सखूचा घसा बरा झाला. आपल्या घरातील आजी-आजोबा व इतर मोठे अनुभवी लोक आपल्याला कधीकधी घरगुती उपाय सुचवतात. उदा. १) खोकला असेल तर झोपताना कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने खोकला कमी होतो. २) सर्दी झाली असेल, तर झोपताना गरम पाण्याच्या वाफारा घेतात. छाती शेकवतात, ज्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडतो. घरातील एखाद्या व्यक्तीस ताप आला असेल आणि त्या व्यक्तीस उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवण्याचा आग्रह न करण्याचा सल्ला घरातील वडीलधारे माणसे देतात. तसेच त्या व्यक्तीस लिंबाचे थंडगार सरबत पिण्यास सांगतात. दुसऱ्या दिवशी दहीभात खायला देतात. वरील उदाहरांवरून आपल्या लक्षात येईल की काही घरगुती उपाय केल्याने काही आजार बरे होतात. तसेच कुणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली, तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी, ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. जखम झाल्यानंतर जंतु, संसर्ग होण्याची शक्यता असते. ती स्वच्छ न करताच कापूस किंवा पट्टी बांधली तर त्या जंतूंमुळे ती जखम जास्तच वाढण्याची शक्यता असते. मुलांनो, काही आजार घरगुती उपचाराने बरे होतात. म्हणून सर्वच आजारांवर घरगुती उपाय करणे चुकीचे आहे. आजार छोटा जरी असला आणि दोन दिवस घरगुती उपचार करूनही काही फरक पडत नसेल तर अशावेळी डॉक्टरांना दाखविणे व त्यांचा सल्ला लक्षात घेणे हे सर्वात उत्तम ठरते. घरगुती उपाय करून बरे वाटत नसेल तर दवाखान्यात गेलेच पाहिजे. उदा: दोन-तीन दिवस खोकला थांबण्यासाठी घरगुती उपचार करून खोकला थांबत नसेल त्याऐवजी तो वाढत असेल तर अशावेळी डॉक्टरांना दाखविणे गरजेचे ठरते. कारण ते डांग्या खोकला किंवा टी.बी चे लक्षण असू शकते. आणि या रोगांचा इलाज घरगुती उपायाने होऊ शकणार नाही. आपण जी औषधे खाणार असतो म्हणजे जी औषधे पोटात जातात, ती औषधे आपल्या मनाने किंवा इतरांच्या सांगण्यावरून घेऊ नयेत. तर अशी औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य ठरते.