माझा जिल्हा माझे राज्य

करून पहा

views

4:02
आज आपण कोल्हापूरच्या शेतीला व शेतकऱ्याला भेट देणार आहोत. तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांना शेतीविषयी तुमच्या मनात असलेले प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या शेतात कोणकोणती पिके निरनिराळ्या हंगामांत घेतली जातात? आम्ही आमच्या शेतात ऊस, गहू, तूर, सोयाबीन, टोमॅटो, कडधान्ये, झेंडूची फुले यांसारख्या विविध प्रकारची पिके घेतो. तुमची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे की, इतर सुविधांचा वापर करून शेतीला पाणीपुरवठा करता? आमच्या एकूण शेतीपैकी थोडी शेती जिरायती शेती आहे. ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्या जमिनीत आम्ही भात, सोयाबीन, तूर, मटकी, चवळी यांसारखी पिके घेतो. तर इतर शेतात आम्ही बागायती शेती करतो. त्यात प्रामुख्याने ऊस, गहू, टोमॅटो, झेंडूची फुले यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतो. यासाठी आम्ही विहीर, कूपनलिका यांसारख्या जलसिंचनाच्या सुविधांचा वापर करतो. शेती करीत असताना कोणकोणत्या गोष्टी शेतीवर परिणाम करतात असे तुम्हाला वाटते? पहिले म्हणजे पावसाच्या प्रमाणावर किंवा पावसावर पूर्णत: शेती अवलंबून असते. जरी आपण विहिरी, कूपनलिका यांचा वापर करीत असलो तरी, त्यांच्यातही पाणी येण्यासाठी पावसाची आवश्यकता असतेच. म्हणून पाणी हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर कीड, शेतीतील तण(गवत), मजूर पुरवठा, भांडवल, बाजारपेठ, वाहतुकीच्या सुविधा व मालाला मिळणारा भाव (किंमत) या सर्व गोष्टींचा शेतीवर परिणाम होत असतो. या शेतकऱ्याकडून तुम्ही मिळवलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात आले असेल, की एकाच शेतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. उदा: ज्या शेतात सोयाबीन घेतले जाते त्यातच ऊस, टोमॅटो यांसारखी पिके घेतली जातात. तसेच शेती करण्यासाठी पाणी हे अत्यंत गरजेचे असते. पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही. मग ते पाणी कोणत्याही मार्गाने मिळो. म्हणजेच विहीर, कूपनलिका, तलाव, धरण, पावसाचे पाणी कशातूनही मिळो पण पाणी हा घटक शेतीसाठी अत्यावश्यक आहे.