माझी आनंददायी शाळा

करून पहा

views

3:40
आपण आपल्या शाळेतील मुलामुलींच्या गरजा आणि अडचणी समजून घेतो का? आपण कोणाला मदत करतो का? हे पण आपल्या मनाला विचारणे आवश्यक आहे. आपल्या वर्गात अशी अनेक मुले असतील की ज्यांना आपल्या मदतीची गरज असेल. उदा. १) आपल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्याच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. त्याच्या मनातील नवीन जागेची भीती घालविली पाहिजे. 2) काही मुले आई – वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत असतात. म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे राहून किंवा होस्टेलवरती राहून शिक्षण घेत असतात, तर त्यांना आपण प्रेमाने वागविले पाहिजे. 3) मुलांनो, काही मुले खेडेगावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा मुलांची भाषा वेगळी असते. म्हणजे ते घरात वेगळया भाषेत बोलतात. अशी मुले शाळेत बोलताना लाजतात. चुकून आपल्या तोंडातून वेगळा शब्द गेला तर, या भीतीने ते कमी बोलतात. आपण अशा मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 4) आपल्या वर्गातील सर्वच मुलामुलींना मदत करण्यासाठी त्यांच्या घरी ताई किंवा दादा असतीलच असे नाही. अशा वेळी आपण त्या मुलामुलींना मदत करावी. आपल्या शाळेत काही शारीरिक व्यंग असणारे विद्यार्थीही असतात. म्हणजेच काही जणांना कमी दिसते, बोर्डवरती लिहिलेली अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत, काही जणांना कमी ऐकू येते. काही विद्यार्थी सहजपणे चालू शकत नाहीत. काही मुले अडखळत बोलतात. काहीजण मंदबुद्धीचे असतात. अशी अनेक प्रकारची शारीरिक कमतरता किंवा अपंगत्व असणारी मुले आपल्याबरोबर शिक्षण घेत असतात. अशा मुलांच्या गरजा आपल्याला त्यांच्या सहवासातूनच समजू शकतात. म्हणून अशा मुलांना आपण कमी न लेखता किंवा त्यांना नावे न ठेवता, त्यांना न हसता, त्यांच्यातील दोष किंवा उणीवा लक्षात घेऊन त्यांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.