अश्मयुग : दगडाची हत्यारे

गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार

views

4:54
अश्म म्हणजे दगड. अश्मयुग म्हणजे दगडाचे युग. या युगातील मानवाला अश्मयुगीन मानव असे म्हणायचे. या युगातील मानव दगडापासून हत्यारे बनवायचा. आज आपण अश्मयुग आणि दगडाची हत्यारे या विषयांचा अभ्यास करणार आहोत.चिंपांझीसारखा वानर फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करतो. तसेच वारुळामध्ये असणाऱ्या मुंग्या तो बारीक काडीने काढून खातो. मानवही मेलेल्या प्राण्यांची हाडे, दगडे, वाळक्या काठ्या आणि काटक्या यांचा उपयोग हत्यारांसाठी करू लागला. मानव हुशार होता. तो प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करीत असे. त्याच्या कल्पनाशक्तीच्या आधारे त्याच्या लक्षात आले की काठ्या, काटक्या, हाडे दगड ही साधने आपण तासून बारीक करू शकतो. त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो. आणि आपण असं जर केलं तर आपली कामं अधिक चांगली आणि लवकर होतील. कुशल मानवाच्या अवशेषांच्या शेजारी आपल्याला दगडाची हत्यारे सापडली होती. म्हणून आपण म्हणतो की ही दगडाची हत्यारे कुशल मानवाने बनविली असावीत. पण केवळ दगडाची हत्यारे मिळाली म्हणजे त्याने हत्यार बनवण्यासाठी फक्त दगडाचाच उपयोग केला असावा असे नाही. तर त्याने हाडे, काटक्या यांपासूनही हत्यारे बनविली होती, असे आपण म्हणू शकतो. काटक्या टिकाऊ वस्तू नसल्यामुळे काटक्यांपासून बनवलेली हत्यारे आपल्याला सापडली नाहीत. मात्र हाडांची काही हत्यारे सापडली आहेत. दगड आणि हाडे यांच्यापासून बनवलेल्या हत्यारांमध्ये दगडी गोठ्याचे तोडहत्यार, तासणी, वर्तुळाकार घण, दगडी छिलक्याचे तोडहत्यार, हाडाच्या टोच्या, शिंगाचे खणते अशी विविध हत्यारे सापडली आहेत.