शिवरायांची युद्धनीती

प्रस्तावना

views

4:07
प्रस्तावना : मुलांनो, शिवरायांना प्रत्येक आघाडीवर यश प्राप्त झाले. त्यांनी शक्तीऐवजी युक्तीचा वापर करून आपली प्रत्येक संकटातून सुटका करून घेतली. या यशात त्यांचे सरदार, मावळे, त्यांचे युद्ध तंत्र, किल्ले, आरमार या सर्वांचा वाटा होता. त्याची माहिती आज आपण या पाठात घेणार आहोत. शिवरायांचे शौर्य व धैर्य :- मुलांनो, आपण पाहिले की ज्या वयात मुले वेगवेगळे खेळ खेळतात, त्या वयात शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी अतिशय लहान वयापासून प्रयत्न सरू केले होते. शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बाल सवंगड्य़ांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. तेव्हापासून ते वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत त्यांनी अहोरात्र आपला देह स्वराज्यासाठी झिजविला. त्यांनी आपला अखेरचा श्वास राजधानी रायगड येथे घेतला. अवघ्या पस्तीस वर्षांच्या काळात महाराजांनी सुमारे तीनशे – चारशे वर्षे गुलामगिरीत असणाऱ्या जनतेला सर्व बंधनातून मुक्त केले. शिवरायांनी हे सर्व ताकदीच्या जोरावर मिळविले असे नाही. त्यांची ताकद शत्रूच्या तुलनेत फारच कमी होती. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर व राजकीय डावपेचांच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. . अफजलखानाचा वध, शायिस्तेखानावरील हल्ला, सुरतेची लूट यांसारख्या अत्यंत कठीण प्रसंगांवेळी महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन विजय मिळविला. स्वराज्यावर एक ना अनेक संकटे आली, पण शिवराय कोणत्याच संकटाला घाबरले नाहीत की डगमगले नाहीत. त्यांनी प्रसंगी युद्ध केले. तर काही वेळी त्यांनी स्वराज्याचा व दूरवरच्या गोष्टींचा विचार करून दोन पावले मागे घेत त्या प्रसंगांना तोंड दिले.