संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

प्रस्तावना

views

4:40
मुलांनो, आज आपण संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध म्हणजे काय ते पाहणार आहोत. मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्यांची उत्तरे द्या. त्याच उत्तराच्या आधारे आपल्याला समजेल की संसर्गजन्य रोग म्हणजे काय? आणि हे रोग कशामुळे होतात? संसर्गजन्य रोग: मुलांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की, काही रोग हे रोग्याच्या संपर्कातून होतात. तर काही रोग कितीही भयंकर असले तरी त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्याने होत नाहीत. उदा: आईचा हात भाजून तिला झालेली जखम असेल किंवा आजोबांची पाठदुखी असेल तर हे आजार दुसऱ्यांना होत नाहीत. पण स्वाईन फ्ल्यू, पडसे, नायटा, खरुज, कांजिण्या, गोवर असे आजार ज्या व्यक्तींना झालेले असतात, त्यांच्यापासून थोडे दूर राहावे लागते. हे रोग रोग्याच्या सहवासात आल्याने, रोग्याच्या वस्तू, कपडे वापरल्याने इतरांना होऊ शकतात. ज्या रोगांची लागण एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. मुलांनो, असे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्यास महत्त्वाचे कारण म्हणजे हवेतून त्या रोगाच्या जंतूंचा प्रसार होणे. हवेतील रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्याने असे रोग एकाकडून दुसऱ्याला होत असतात. उदा: एखाद्या व्यक्तीला पडसे म्हणजे सर्दी झाली असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंका व खोकण्यातून हवेत मिसळतात. असे हवेत मिसळलेले रोगजंतू दुसऱ्यांच्या शरीरात गेले की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे किंवा सर्दी होऊ शकते. याला रोगप्रसार असे म्हणतात. रोगप्रसार म्हणजे रोगाचे पसरणे होय. जसे की एखाद्या व्यक्तीला टायफॉईड झाला असेल व त्या व्यक्तीच्या शरीरातील विषमज्वराचे रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने निरोगी व्यक्तीसही टायफॉईडची लागण होऊ शकते.