गतीचे नियम

न्यूटनचा गतविषयक तिसरा नियम

views

4:51
आता आपण न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम बघू या. “प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्परविरुद्ध असतात.” उदाहरणार्थ, बंदुकीतून गोळी सुटली असता बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होत असते. किंवा अग्निबाणाचे उड्डाण होत असताना इंधनाचे ज्वलन होऊन निर्माण झालेल्या उष्ण वायूमुळे दाब निर्माण होतो व अग्निबाणाचे प्रक्षेपण होते. तसेच चेंडू वरून खाली टाकला तरी पुन्हा तो खालून वर येतो. मुलांनो, आपण न्यूटनच्या पहिल्या व दुसऱ्या नियमांचा विचार केला तर त्या नियमांमधून बल व बलाचे परिणाम यांची माहिती मिळते. परंतु निसर्गामध्ये बल हे एकाकी असत नाही. बल ही दोन वस्तूंवरील क्रिया असते. कारण बल प्रयुक्त होण्यासाठी दोन वस्तूंची गरज असते. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते तेव्हा दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की दोन वस्तूंवरील बल नेहमी समान व विरुद्ध असतात. हीच कल्पना न्यूटनने त्याच्या तिसऱ्या नियमात मांडली आहे. म्हणूनच पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास ‘क्रिया बल’ तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास ‘प्रतिक्रिया बल’ असे म्हणतात.” प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.