छोटे आजार, घरगुती उपचार

प्रस्तावना

views

4:31
माणसाला अनेक प्रकारचे छोटे मोठे आजार होतात. काही आजार पटकन बरे होतात. तर काही अनेक दिवस उपचार केल्यानंतरही बरे होत नाहीत. किंवा बरे होण्यासाठी खूप दिवसांचा कालावधी लागतो. काही आजार बरे होण्यासाठी दवाखान्यात जावे लागते. तर काही घरगुती उपायांनी बरे होतात. अशा काही आजारांची व त्यावरील उपचारांची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. ज्यावेळी आपली प्रकृती किंवा तब्येत ठीक असते, चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. आपण रात्री व्यवस्थित झोपतो. आपल्याला गाढ झोप लागते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनाची तक्रार नसते, मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्यालाच ताजेतवाने उत्साही वाटते. छोटी-छोटी कामे केली तरी थकवा वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडू शकतो. ताप येणे, सर्दी होणे, डोके दुखणे, अंग दुखणे, घसा दुखणे यांसारख्या कारणांनी आपण आजारी पडू शकतो. त्यावेळी आपल्याला काही खावेसे वाटत नाही. नीट झोप लागत नाही. झोप न लागल्याने अपचन होणे, यांसारख्या तक्रारी वाढतात. त्यामुळे सकाळी आळस, थकवा, कंटाळा आल्यासारखे वाटते. अशाच प्रकारचा एक त्रास सखूला होऊ लागला. तिने थंडगार आईस्क्रीम खाल्ले, दुसऱ्या दिवशी तिला घास गिळताना त्रास होऊ लागला. तिचा घसा दुखू लागला. तिच्या आईने तिला दोन दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यानंतर मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सखूचा घसा दवाखान्यात न जाता, औषधोपचार न घेता पूर्णपणे बरा झाला. सखूचा घसा दुखणे हा आजार छोटा होता, म्हणून तो घरगुती उपायांनी लवकर बरा झाला.