शिवरायांचे बालपण

नव्या निजामशाहीची स्थापना

views

2:54
वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहा शहाजहान यांना शह देण्यासाठी, शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली एक नवे राज्यच स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा नदी या दोन्हींच्या मधला प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शौर्याने व हिमतीने लढले. या कामी आदिलशाहाने प्रथम त्यांना साथ दिली. पण पुढे स्वत: मुघल बादशाह शाहजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाहास शाहजीराजांना मदत न करण्याची धमकी दिली. तेव्हा आदिलशाहाने बादशाहाला घाबरून शहाजी राजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. मुघल व आदिलशाही यांच्या एकत्र झालेल्या फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. मुलांनो, गनिमी कावा ही एक युद्ध खेळण्याची छुपी पद्धत आहे. यात अतिशय कमी सैन्य असलेल्या सैन्याने मोठ्या सैन्यास सळो की पळो करून सोडता येते. यात बेसावध शत्रूवर हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे अशी पद्धत वापरली जाते. त्यामुळे शत्रू गोंधळून जात असे. त्यामुळे कमी सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकत होते. या गनिमी कावा तंत्राचा महाराजांनी उपयोग केला. परंतु, एकटे शहाजीराजे किती दिवस लढणार! त्यांची शक्ती कमी पडू लागली. तेव्हा नाईलाजाने १६३६ साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, जिकडे जाईल तिकडे त्यांचे शत्रू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना वाटू लागले. शहाजीराजांसारखा सरदार आपणांस मिळाला तर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो. लोकांचा हाच आत्मविश्वास पुढे शिवरायांना स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला.