प्रतापगडावरील पराक्रम

खानाने विडा उचलला

views

03:09
ताटातील पानाचा विडा उचलत अफजलखान म्हणाला, ”शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा सापडला नाही तर त्याला ठार मारून विजापुरी आणतो.” अशा प्रकारे खानाने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला. म्हणजे ते कार्य आपल्या शिरावर घेतले. अफजलखानाच्या बोलण्यावरून आपल्याला समजते की अफजलखान शिवरायांना तुच्छ, आणि कमी लेखत होता. त्याला वाटे, मी त्याला सहज पकडून आणू शकतो पण मुलांनो, खानाला हे माहीत नव्हते की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. तरीही शिवरायांना अफजलखानाला सामोरे जाणे जड जाणार होते. कारण अफजलखान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार होता. त्याच्या अंगात तुफान ताकद होती. लोखंडी पहार हातांनी तो वाकवायचा. चांगल्या किंवा वाईट कोणत्याही मार्गाचा वापर करून आपले काम करण्यात तो पटाईत होता. अतिशय बलशाली अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा दरबारात उचलला. त्यामुळे सारा दरबार खूश झाला. दरबारातील प्रत्येकाला वाटू लागले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो! थोडयाच दिवसात साखळीने बांधलेला शिवाजी विजापूर दरबारात हजर होणार, नाही तर धडापासून अलग केलेले त्याचे मुंडके तरी दरबारात हजर होणार, असे दरबारातील प्रत्येकाला वाटत होते. यावरूनच अफजलखानाची ताकद काय होती ते लक्षात येते. अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी मोठया ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर फार मोठी फौज व लढाईचे सामान घेतले. अफजलखान यापूर्वी बारा वर्षे वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या प्रांताची चांगली माहिती होती. मोठया गुर्मीने व घमेंडीत तो महाराष्ट्राची वाट चालू लागला.