जिल्हा प्रशासन

प्रस्तावना, जिल्हाधिकारी

views

3:42
जिल्हा परिषद हा पंचायती राज्यव्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे त्याच राज्यव्यवस्थेचे इतर घटक आहेत. महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन म्हणजेच जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडूनही केला जातो. यामध्ये संघशासन म्हणजेच केंद्रसरकार आणि राज्यशासन म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार सहभागी असतात. जिल्हाधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो. तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असतो. त्यालाच कलेक्टर म्हणतात. जिल्हाधिकाऱ्याची निवड संघ लोकसेवा आयोग करतो. त्याची नेमणूक राज्यशासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा म्हणजे जमिनीवरील कर गोळा करण्यापासून जिल्ह्यात कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. यातील महत्त्वाचे कार्य म्हणजे सामाजिक स्वास्थ्य राखणे. समाजात अनेक लोकांचे, धर्मांचे, जातींचे, एकमेकांशी मतभेद, भांडणे, हेवेदावे असतात. त्यांचे निराकरण किंवा सोडवणूक ही शांततेच्या मार्गाने होणे गरजेचे असते. परंतु, काही वेळेस असे होत नाही. त्यातून दंगली, जाळपोळ, हाणामारी आणि अशांतता निर्माण होते. समाजाचे स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन आपल्या प्रगतीला बाधा निर्माण होते. बसेसची तोडफोड, रेल्वे रोको, रस्ता रोको. यामुळे अखेर गैरसोय आपलीच होते. असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतात. वेळीच दक्षता घेऊन शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.