शिवरायांचे बालपण Go Back प्रस्तावना, शिवजन्म views 4:00 मागील पाठात आपण मराठा सरदारांच्या घराण्यांपैकी शूर भोसले घराण्याची माहिती घेतली. आज आपण याच भोसले घराण्यातील शिवरायांच्या जन्माची माहिती घेणार आहोत. शिवजन्म: शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळात म्हणजेच १६ व्या शतकात महाराष्ट्रात दिवस मोठे धामधुमीचे होते. म्हणजेच सतत लढाया, स्वाऱ्या, शत्रूची आक्रमणे चालू असत. आपण पाहिले की शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य पाठविले. दख्खन म्हणजे भारताचा दक्षिण भाग. आणि त्याच दख्खनमधील शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे हे होते. विजापूरच्या आदिलशाहाने पुणे पूर्णपणे नष्ट करून टाकले होते. त्या पुण्यातून त्याने लूट केली होती. लोकांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर! अशा परिस्थतीत ते सापडले होते. म्हणजे एकीकडून आदिलशाहा आणि दुसरीकडून मुघल बादशाह. अशा दोन्ही बाजूंनी ते अडचणीत सापडले होते. त्यांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन धावपळ करणे शक्य नाही हे शहाजीराजांनी ओळखले. पण त्यांना ठेवायचे कुठे? हा प्रश्न त्यांना पडला होता. अशा वेळी शहाजीराजांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. हा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित होता. कारण किल्ल्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. तटबंदी म्हणजे किल्ल्याच्या भोवतीने बांधलेली उंच भिंत होय. ज्याच्यामुळे शत्रूला सहजासहजी किल्यात घुसता येत नसे. शिवनेरी किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. मुलांनो, किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख असे. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरून उघडले अथवा बंद केले जात असत. एखाद्या वेळी शत्रूने गडावर हल्ला केला तर गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे. तर असे महत्त्वाचे काम पाहणारे विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातीलच होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले व ते मुघलांना रोखण्यासाठी त्यांच्यावर चालून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. या दिवशी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. भोसले घराण्याचा वारसा चालविण्यासाठी बाळाने जन्म घेतला होता. किल्ल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. बाळाचे पाळण्यात घालून नाव ठेवण्यात आले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले. प्रस्तावना, शिवजन्म शिवरायांचे बालपण शहाजीराजे मुघल बादशाहीकडे नव्या निजामशाहीची स्थापना जिजाबाई व शिवराय कर्नाटकात