शर्थीने खिंड लढवली

शिवराय वेढ्यातून बाहेर

views

03:44
शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. त्यातील एका पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार होते आणि दुसऱ्या पालखीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून म्हणजे प्रमुख दरवाजातून बाहेर पडणार होती. गडाच्या प्रमुख दरवाज्यातून ही पालखी जाणार असल्याने ती सहज शत्रू सैन्याला दिसणार व ती पकडली जाणार. आणि पळून जाणाऱ्या शिवाजीलाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. सर्व सैन्य त्या ठिकाणी जमा होणार. एवढयात शिवराय गडावरील अवघड वाटेने निसटून जाणार, अशी ती योजना होती. शिवरायांनी योजना तरी चांगली योजली होती पण प्रश्न हा होता की शिवरायांचे सोंग घेऊन दुसऱ्या पालखीत बसणार कोण? कारण शिवरायांचे सोंग घेणे म्हणजे मृत्यूला मिठी मारणे होते. पण एवढे सर्व होणार हे माहीत असूनही एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. आणि त्याचे नाव सुद्धा शिवाजीच होते. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. हा शिवाजी मोठा धाडसी होता. म्हणूनच तो मृत्यूच्या दाढेत जायला तयार झाला. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या दुसऱ्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या दरवाजातून बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस पडत होता, शत्रूचे काही सैनिक मौजमस्ती करण्यात दंग झाले असले तरीही काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. अशा पालखीतून शिवाजीशिवाय दुसरे कोण जाईल: त्यामुळे शिवाजीराजांनाच पकडले असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. आयता शिवाजी आपल्या तावडीत सापडला म्हणून तेथे जल्लोष सुरू झाला. याच दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. याची शत्रूला जराही खबर लागली नाही. शिवरायांसोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. एवढया फौजफाटयासह शिवराय पुढे निघाले. तोपर्यंत इकडे थोडया वेळाने त्या दुसऱ्या शिवाजीचे सोंग उघडकीस आले. हा खरा शिवाजी नाही, हे समजताच सिद्दी रागाने लाल झाला. त्याने त्याच ठिकाणी, त्याच क्षणी सोंग घेतलेल्या शिवाजीला ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी या शिवाजीने स्वत:चा जीव दिला होता. तो अमर झाला. आजही शिवाजी महाराजांचा इतिहास बघताना त्याचे नाव व कार्य आपोआपच समोर येते. याला म्हणायचे स्वामीनिष्ठा. शिवाजी आपल्याला फसवून निसटून गेल्याचे लक्षात येताच सिद्दी रागाने चवताळून गेला. एवढया दिवसांची मेहनत काही क्षणात वाया गेली होती. त्याने लगेचच सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठी फौज घेऊन शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठविले. पाठलाग चालू झाला. सिद्दी मसऊद व त्याच्या सैन्याने वा-याच्या वेगाने शिवरायांचा पाठलाग करून दिवस उजाडता पांढरपाणी ओढयावर त्यांना गाठले. शिवराय अडचणीत सापडले. त्यांनी कशीतरी घोडखिंड ओलांडली.