स्फूर्तीचा जिवंत झरा

स्वदेशाभिमान

views

4:15
स्वदेशाभिमान :- मुलांनो, आपल्याला माहीतच आहे, की शिवराय हे शहाजीराजे या मातब्बर सरदाराचे पुत्र होते. त्यांना धनदौलतीची कमतरता नव्हती. पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात गुलामगिरीबद्दल राग, द्वेष व तिरस्कार होता. त्यांच्या मनात नेहमी हा विचार येई की, आपल्या देशात आपले स्वत:चे राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करता यावे, आपल्या मुलखात आपल्या मराठी भाषेला, आपल्या हिंदू धर्माला मान मिळावा. हे सर्व मिळवायचे असेल, तर त्यासाठी आपले स्वत:चे राज्य असणे खूप गरजेचे आहे, हे महाराज ओळखून होते. हिंदवी स्वराज्य :- हिंदवी स्वराज्य निर्माण करणे हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे; मग ते कोणत्याही धर्माचे असोत किंवा कोणत्याही जातीचे असोत. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य होय. शिवरायांचे आठवावे रूप :- समोर सर्व पर्याय बंद झालेले आहेत, असे वाटत असताना त्यातूनच एखादा मार्ग शोधून काढायचा. संकटांना घाबरून न जाता त्यांच्यावर मात करून पुढे जायचे. मोठयातील मोठया शत्रूशी आपल्या मर्यादित बळाने झुंज देत हळूहळू आपली ताकद वाढवत जायची. ‘शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप ||’ मुलांनो, महाराजांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रेरणा मिळतात, शिवराय म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झराच होते. त्यांच्याकडून आपण जेवढी स्फूर्ती घेऊ तेवढी कमीच आहे.