प्रकाशाचे परावर्तन

प्रस्तावना

views

4:09
प्रकाश म्हणजे उजेड. कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्या डोळ्यांना जेव्हा दिसते, तेव्हा ती दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो. आपल्याला संवेदनांच्या मदतीने वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. त्या संवेदनांपैकी दृष्टीची संवेदना ही खूप महत्त्वाची संवेदना आहे. दृष्टी संवेदनेमुळेच आपण नदी, झाडे, व्यक्ती, डोंगर, दऱ्या, कडे, कपारी, व वस्तू ह्या सर्व आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे सर्व दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाशाचे होणारे परावर्तन होय. तर आज आपण प्रकाशाच्या परावर्तनाविषयीची माहिती या पाठात घेणार आहोत. आपल्या डोळ्यांना वस्तू दिसतात म्हणजे दृष्टीची संवेदना व प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी दिवा लावला की वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो. कारण वस्तूपासून येणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि ती वस्तू आपल्याला दिसू लागते. डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. तर आता आपण वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय ते समजून घेऊया. “एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली, तर त्या प्रकाशकिरणांची दिशा बदलते व ते परत फिरतात यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात." म्हणजेच एखादी वस्तू ही आपल्या डोळ्यांनी दिसते तेंव्हा त्या वस्तूवर पडलेले प्रकाशकिरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात प्रवेश करतात.