राज्यशासन

मुख्यमंत्र्यांची कार्ये

views

5:14
1) मंत्रिमंडळाची निर्मिती: आपल्या पक्ष्याला बहुमत मिळाले आहे हे सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. मुख्यमंत्र्यांच्या सर्व कामात हे तसे अवघड व आव्हानात्मक काम असते. कारण मंत्रिमंडळामध्ये अनेक सामाजिक घटकांतून निवडून आलेले सदस्य असावे लागतात. उदा: अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्यांक इत्यादी. या समाजघटकांतील उमेदवारांचा मंत्रिमंडळात समावेश करून मंत्रिमंडळ जास्तीत जास्त प्रातिनिधिक करावे लागते. म्हणजे मंत्रिमंडळात सर्व स्तरातील सदस्यांना संधी द्यावी लागते. तसेच विशिष्ट खाते सांभाळण्यासाठी तेवढी सक्षम व्यक्ती मिळणेही गरजेचे असते. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. अशा परिस्थितीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे अवघड काम मुख्यमंत्री पार पाडतात. 2) खातेवाटप: मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते. खातेवाटप करणे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने कौशल्याचे काम आहे. कारण खातेवाटप करताना त्या मंत्र्यांचा राजकीय अनुभव पाहणे गरजेचे असते. म्हणजे किती वर्षे मंत्री राजकारणात आहे, प्रशासनातील अडी-अडचणी ते आपले कौशल्ये वापरून कसे सोडवितात, त्यांची लोकमताची जाण कशी आहे हे सर्व लक्षात घ्यावे लागते. तसेच खात्याचा प्रमुख या नात्याने नेतृत्व करण्याचा गुण किंवा कौशल्य त्या मंत्र्यात असणे गरजेचे असते. या सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्र्यांना खातेवाटप करावे लागते. 3) खात्यांमध्ये समन्वय: मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे एकत्रितरितपणे विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते. म्हणजे ज्यावेळी विधानसभेच्या बैठका, अधिवेशने असतात, त्यावेळी विधानसभेचे सदस्य मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळास त्यांच्या अपूर्ण व न झालेल्या कामांबद्दल जाब विचारतात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या मंत्रिमंडळांना समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपल्या सर्व खात्यांमध्ये समन्वय ठेवून काम करावे लागते. खात्या-खात्यांमध्ये जर सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या एकूण कामगिरीवर होतो. 4) राज्याचे नेतृत्व: मुलांनो, आपल्याला माहीत आहे की संपूर्ण देशाचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान करतात. त्याचप्रमाणे घटकराज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री करतात. राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीकडे लक्ष देऊन असते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील लोकांचे हित, भलं कशात आहे.हे पाहणे व त्यानुसार धोरणे राबविणे गरजेचे असते. तसेच राज्यातील लोकांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नवीन धोरणांची निर्मिती करायची असते. उदा: एखाद्या वर्षी राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर, मुख्यमंत्री कमी पाउस पडलेल्या प्रदेशांचा आढावा घेऊन त्याठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल, तर दुष्काळ जाहीर करतात. त्यानंतर लगेच तेथे नवीन धोरण राबवून दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना करता येतात.