महासागरांचे महत्त्व

महासागराचे मानवी जीवनातील महत्त्व-भाग 3

views

5:53
१) वायुदाबपट्टे व वारे : विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या प्रदेशातील तापमान जास्त आढ़ळते. याचा परिणाम म्हणून या भागात जमीन व पाणी जास्त तापते. तर ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात. यामुळे त्या प्रदेशात तापमान खूप कमी आढ़ळते. म्हणून या भागात जमीन व पाणी शीत राहते. एकंदरीत जमीन व पाणी यांच्या तापमानातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायूदाब फरकामुळे ‘वारे’ वाहतात त्यांना ‘ग्रहीय वारे’ असे म्हणतात.२) सागरी प्रवाह : ग्रहीय वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. ते प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. या पैकी उष्ण प्रवाह हे नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात. तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशांकड़े वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकड़े वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे चलनवलन होते. उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. थोडक्यात महासागरामुळे जागतिक तापमानाचे नियंत्रण करण्याचे काम होते. ३)पर्जन्यचक्र : महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत चालू असल्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. म्हणूनच महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. आणि पडणारे पावसाचे पाणी हे नद्या, नाले, ओढ़े या द्वारे पुन्हा समुद्र, महासागरांना मिळते. म्हणजे पर्जन्यचक्राची सांगता देखील महासगरातच होते. ४) महासागर व संसाधने: महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले इत्यादी उत्पादने मिळतात. तसेच लोह, शिसे, पारा, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, सोने अशा प्रकारची खनिजे मिळतात. याशिवाय समुद्रातून खनिज तेल, व नैसर्गिक वायू देखील मिळतो. त्याच बरोबर समुद्रातून मोती व पोवळे, शंख व शिंपले यांसारख्या वस्तू मिळतात. औषधी वनस्पतीही महासागरातून मिळतात. या सर्व खनिज पदार्थांमुळे मानवी जीवनाचा विकास झाला आहे. महासागर व वाहतूक : मानवी जीवनात वा देशाच्या विकासात ‘वाहतूक मार्ग’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आज रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक व जलवाहतूक या मार्गाचा वापर होतो. परंतु जलवाहतूक ही इतर वाहतूक मार्गांपेक्षा स्वस्त असते. रस्ते आणि रेल्वेमार्ग उभारणीचा खर्च प्रचंड असतो. जलवाहतुकीसाठी त्या प्रकारचा उभारणी खर्च नसतो. अवजड वाह्तुकीसाठी तसेच इंधन बचतीसाठी हा मार्ग खूप सोयीस्कर असतो. परिणामी आर्थिक खर्च, वेळ, वाचला जातो हवाई मार्गाने जड गोष्टींची वाहतूक करणे शक्य नसते. आज जलमार्गाने जहाजे, बोटी, नावा, यातून माल वाहतूक केली जाते. महासागरांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विस्तारामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले जाऊन जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे.