मानवाची वाटचाल

शक्तिमान मानव

views

4:44
मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव होय. याला शक्तिमान का म्हणायचे तर याची शरीरयष्टी धिप्पाड म्हणजेच एखाद्या पैलवानाप्रमाणे होती. याचे अवशेष हे सर्वप्रथम जर्मनी या देशातील ‘निअँडरथल’ या ठिकाणी सापडले म्हणून त्याला ‘निअँडरथल मॅन’ असेही म्हणतात. या मानवाचा मेंदू हा ताठ कण्याच्या मानवाच्या मेंदूपेक्षा जास्त विकसित होता. हा माणूस गुहांमध्ये राहत असे. दगडापासून निघालेले छिलके म्हणजेच पापुद्र्यांपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे हा मानव बनवत असे. ही हत्यारे लांब हाडे किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून त्यापासून भाला किंवा कुऱ्हाड अशी शस्त्रे बनवत असे. याच हत्यारांच्या साहाय्याने तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. तसेच तो चामड्यांवरील मांस खरवडण्यासाठी दगड तासून जे छिलके निघत त्यापासून तयार केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. न्हावी जसा एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण गोटा करण्यासाठी तासणीचा वापर करतो, तशाच प्रकारची मांस खरवडण्याची तासणी या मानवाने तयार केली होती. हा मानव जनावरांच्या चामड्यापासून / कातड्यांपासून तयार केलेले कपडे वापरत असे. तसेच तो आपल्या अन्नात मांसाचा वापर करत असे. म्हणून तो मांसाहारीही होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. फांद्यांच्या घर्षणातून जसा अग्नी निर्माण होतो, तसेच गारगोटीचे दगड एकमेकांवर आपटले असता त्यातूनही आगीच्या ठिणग्या तयार होऊ शकतात हे या मानवाला समजले होते.