अश्मयुग : दगडाची हत्यारे

अश्मयुगीन हत्यारे

views

3:17
ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड हे आपण या आधी शिकलो आहोत. हत्यारांचा आकार व प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन खंड पडतात. ते असे आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पुराश्मयुग भाग १ :- पुराश्मयुगाचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळातील मानव आपले जीवन जगण्याकरिता कंदमुळे, आणि प्राण्यांचे कच्चे मांस खात होता. नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे, हे कळल्यावर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला ‘आघात तंत्र’ असे म्हणतात. याच आघात तंत्राचा वापर करून पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ कण्याच्या मानवाने हत्यारे बनविली. परंतु या हत्यारांच्या केवळ एकाच बाजूला धार असल्यामुळे ही हत्यारे ओबड – धोबड होती. कुशल मानवाने तयार केलेल्या हत्यारांचा उपयोग केवळ कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी होत होता. दगडाची हत्यारे बनविताना त्या दगडाचे धारदार छिलके निघत असत. या छिलक्यांचाच उपयोग कुशल मानव कातड्याला चिकटलेले मांस काढण्यासाठी किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करण्यासाठी करीत असे. म्हणजेच अशा प्रकारच्या कामासाठी त्याने वेगळे हत्यार बनवले नव्हते. यावरून असे समजते की कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झाले नव्हते. कुशल मानवाच्या तोडहत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनविलेली हातकुऱ्हाड आणि फरशी जास्त प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची एक वेगळी कुऱ्हाडच असते. ताठ कण्याचा मानव हुशार होता. म्हणूनच त्याने आपल्याला कोणकोणत्या हत्यारांची आवश्यकता आहे याचा आधी विचार केला. आणि त्याप्रमाणे त्याने वेगवेगळी हत्यारे बनविली. दगडी हत्यार बनवताना छोटे छिलके तयार होत असत. हे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूचा घण वापरला. शिवाय याच छोट्या छिलक्यापासून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवड्या व तासण्या बनवल्या. या नवीन तयार केलेल्या हत्यारांमुळे ताठ कण्याच्या मानवाला हरीण, ससा, गवा यांसारख्या छोट्या – मोठ्या प्राण्यांची शिकार करणे शक्य झाले. त्यामुळे त्याला विविध प्रकारचे अन्न मिळू लागले.