आपल्या संविधानाची ओळख

संविधानाची आवश्यकता

views

3:24
कोणतीही संस्था, संघटना, एखादी शाळा, बँक हे स्वत:च्या विकासासाठी आपली नियमावली तयार करतात. आणि त्यानुसार आपला कारभार सांभाळतात. तेंव्हाच त्यांची प्रगती होते. तसेच देशाच्या विकासासाठीही आपल्या संविधानात काही नियम दिले आहेत. पण हे नियम तयार करण्याची आवश्यकता का भासली हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. तर आता आपण त्याची कारणे पाहू.1) शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेले अधिकार, सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक जिंकून गेले असले तरी संविधानातील नियमांप्रमाणेच त्यांना वागावे लागते.2) संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांचा समावेश केलेला असतो. त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला असतो. शासनाला हे हक्क, नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे पहा १८ वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. तो अधिकार जर कोणी तुमच्याकडून हिरावून घेत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.3) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजेच संविधानातील नियम हे लिखित स्वरूपाचे असतात. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग केला तर त्या विरुद्ध न्यायलयात दाद मागता येते.4)संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास अधिक वाढतो. त्यातून ते राज्यकारभारातील सहभागाला उत्सुक होतात. व सामान्य माणसाच्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. 5)संविधान त्या – त्या देशासमोर राजकीय आदर्श ठेवते. उदा. भारतीय संविधानाने आपल्यासमोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे संवर्धन होते.6)नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. म्हणजे सामान्य नागरिक हक्कासाठी लढत असतात. परंतु कर्तव्य पालनाची वेळ येते तेव्हा सर्व मागे सरतात. संविधानामध्ये कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिक आपल्या जबाबदारीप्रति जागरूक राहतो. तर अशा या सर्व कारणांमुळेच आपल्याला संविधानाची गरज भासली.