सामाजिक व धार्मिक प्रबोधन

सत्यशोधक समाज

views

2:11
सत्यशोधक समाज: जोतीराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले यांनी. इ. स १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. समानतेच्या तत्त्वावर आधारित नवीन समाजाच्या निर्मितीसाठी सत्यशोधक समाज या संस्थेने कार्य केले. जनतेने त्यांना १८९० मध्ये महात्मा ही पदवी दिली. मानवी हक्कावर आधारित असलेले थॉमस पेन यांचे पुस्तक इ. स. १७९१ मध्ये फुलेंच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला. समाजातील रूढी, परंपरेमुळे समाजातील विशिष्ट वर्गावर अन्याय होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातींतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर दिला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स १८४८ साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा जोतीराव फुले यांनी ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. महात्मा फुलेंनी स्त्री-पुरुषात भेदभाव करणाऱ्या आणि माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चाली-रितींवर कडाडून टीका केली.