स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

मवाळ युग (१८८५ ते १९०५)

views

2:33
मवाळ युग (१८८५ ते १९०५): राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळातील तिचे कार्य लोकशिक्षणाच्या स्वरूपाचे होते. तसेच हे कार्य संथपणे, पण सतत चालू होते. राष्ट्रीय सभेत यावेळी मवाळ धोरणाचे समर्थन करणारे वास्तववादी व उच्चशिक्षित हिंदी नेते होते. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो. आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन भक्कम अशी संघटना स्थापन केली पाहिजे, असे या लोकांना वाटत होते. या लोकांवर पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा प्रभाव होता. इंग्रजांच्या कार्य पद्धतीवर व न्यायबुद्धीवर त्यांचा विश्वास होता. मवाळ नेत्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्ग म्हणजे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या विनंती अर्ज व निवेदन देऊन शासनकर्त्यांकडून मंजूर करून घेणे होय. चळवळ करताना कोणत्याही कायद्याचा भंग न करता ती शांततेच्या मार्गानेच करायची. सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील, अशी त्यांना आशा वाटत होती. राष्ट्रीय सभेच्या या मवाळ नेत्यांच्या मागण्या होत्या: 1) इंग्रज शासनाची जी प्रांताप्रांतातील प्रांतिक विधिमंडळे आहेत, त्यांच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्ती असाव्यात. म्हणजेच लोकप्रतिनिधी असावेत. 2) नोकऱ्या देताना इंग्रजांनी दुजाभाव करू नये, तसेच भारतातील जे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात. 3) राज्यकर्त्यांनी वाढत्या लष्करी खर्चात कपात करावी. 4) लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्यायसंस्था स्वतंत्र असाव्यात म्हणजे लोकांना योग्य न्याय मिळण्यास मदत होईल. 5) हिंदी कापड उद्योगास संरक्षण मिळावे. असे विविध ठराव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मवाळ गटाने व प्रमुख नेत्यांनी मांडले. पुढे राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडून दोन वेगवेगळ्या विचारसरणी असणारे गट राष्ट्रीय सभेत पडले.