माझी जडणघडण

माहीत आहे का तुम्हाला (हाली बरफ आणि समीप पंडित)

views

3:32
हाली रघुनाथ बरफ किंवा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली आहेत का? हे दोघेही खूप शूर व बहाद्दूर आहेत. त्या दोघांनी मोठा पराक्रम गाजविला आहे. हाली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मुलगी आहे. हालीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. तर समीपने गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशींची आगीतून सुटका केली. त्याबद्दल या दोघांनाही जानेवारी २०१३ मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बाबा आमटे यांचे नाव तुम्ही ऐकले असेल. समाजसेवेत आपले संपूर्ण आयुष्य घालविणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबा आमटे होय. घरची परिस्थिती अतिशय चांगली असतानाही त्यांनी आपले घरदार सोडून अनाथ लोकांसाठी आपले आयुष्य घालविले. कुष्ठरोगी, दृष्टिहीन व अपंग लोकांना स्वत:च्या पायांवर उभे करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. आनंदवन येथे त्यांनी अशा लोकांना निवारा दिला. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी अशा लोकांची सेवा केली. त्यांच्या या महान कार्यात त्यांच्या पत्नी साधनाताई यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या या कार्याचे अनुकरण त्यांच्या मुलांनी व सुनांनी केले. त्यांची मुले प्रकाश व विकास आणि त्यांच्या सुनांनी आजही त्यांचे हे कार्य चालू ठेवले आहे. त्यांची दोन्ही मुलेही डॉक्टर आहेत. सुनाही डॉक्टर आहेत. परंतु डॉक्टर होऊन पैसा कमविण्यापेक्षा आपल्या डॉक्टरीचा त्यांनी समाजातील गरीब, अनाथांना मदत करून चांगला उपयोग करून घेतला आहे. आज त्यांची नातवंडेही चांगली शिकून डॉक्टर झाली आहेत. परंतु तीसुद्धा आपल्या आजोबानी चालू केलेल्या या समाजसेवेच्या कार्यात मोठे योगदान देत आहेत. मुलांनो, आई-वडील, आजी-आजोबा यांचे अनुकरण करता समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे हे उदाहरण खूपच प्रेरणादायी आहे.