माझी आनंददायी शाळा

करून पहा (मुले घरी आई- बाबांशी कोणत्या भाषेत बोलतात)

views

3:56
तुमच्या शाळेतील मुले ही वेगवेगळ्या प्रदेशांतून, कुटुंबातून, आलेली असतात. ती तुमच्याशी प्रमाण भाषेत बोलत असतात. परंतु ती घरी त्यांच्या आई –बाबांशी प्रमाण भाषेत न बोलता त्यांच्या मातृभाषेतच बोलत असतात. म्हणजेच, तुमची सर्वांची शाळेतील शिक्षण घेण्याची भाषा जरी एकच असली, तरी घरी तुम्ही आपल्या मातृभाषेतच बोलत असता. उदा. काहींची मातृभाषा गुजराथी असेल, काहींची मातृभाषा तेलुगु असेल, काहीजण घरी हिंदीत बोलत असतील, तर काही कानडीमध्ये बोलत असतील. या व अशा कितीतरी वेगवेगळ्या मातृभाषा बोलत असलेले अनेक मित्र आपल्याला शाळेमुळे मिळतात. त्यांच्या आणि आपल्या कौटुंबिक परिस्थितीत अनेक फरक असले तरी शाळेमुळे आपल्याला समानतेची जाणीव होते. मुलांनो, आपला शाळेचा सर्वांचा गणवेश एकसारखाच असतो. अगदी गरीबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत मुलेसुद्धा तसाच गणवेश घालत असल्याने आपल्या मनात उच्च-नीच, श्रेष्ठ – कनिष्ठ असा भेदभाव निर्माण होत नाही. एखादया दिवशी तुम्ही सर्वजण गणवेश न घालता आपापल्या आवडीचे कपडे घालून येता त्या दिवशी वर्ग कसा रंगीबेरंगी दिसतो. असाच रंगबेरंगीपणा किंवा विविधता आपल्या वर्गात आहे, म्हणून तर मजा आहे. आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, भाषा, जेवण्याखाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या तरी आपण माणूस म्हणून एकमेकांसारखेच आहोत. मुलांनो, आपल्यापेक्षा इतरांच्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून आपण त्यांचा तिरस्कार, राग, द्वेष न करता त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर, प्रेम, असले पाहिजे. एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा शाळेत आपल्याला खूप मजा येते. अशीच शाळा आपल्याला आनंददायी वाटते.