निवारा ते गाव – वसाहती

हंगामी तळ

views

3:17
पुराश्मयुगातून मध्याश्मयुगात प्रवेश होईपर्यंत पर्यावरणात आणि मानवामध्येही खूप बदल झाले होते. मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. पर्यावरणातील या बदलानुसार बुद्धिमान मानवाने आपल्या आहारातही बदल केला. पूर्वी अन्नासाठी प्राण्यांची शिकार केली जात होती. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी मानवाने अनेक ठिकाणी भटकंती केली. पुराश्मयुगात विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी त्यांचे खाद्य होते. प्राण्यांचा अन्न म्हणून वापर केल्यामुळे फार मोठया प्रमाणावर प्राण्यांची शिकार होत होती. डुकरे, हत्ती, मॅमोथ, अस्वले, घोडे या प्राण्यांची नियमित शिकार केली जाई. या युगाच्या शेवटी शेवटी तर हरणे, शेळ्या-मेंढ्या, यांसारख्या छोट्या जनावरांचे मांस हा एक आहाराचा भागच झाला होता. अशाप्रकारे मोठया प्रमाणात होणारी प्राण्यांची शिकार व पर्यावरणातील बदल यामुळे पुराश्मयुगातून मध्याश्मयुगात प्रवेश होईपर्यंत अनेक प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या होत्या. हत्तीचा पूर्वज असलेला मॅमोथसारखा महाकाय प्राणी नष्ट झाला. हत्तीच्या तुलनेने तो आकाराने प्रचंड मोठा होता. मोठया प्रमाणात झालेल्या प्राण्यांच्या शिकारीमुळे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे बुद्धिमान मानव शिकारीच्या बरोबरीने मोठया प्रमाणावर मासेमारी करू लागला. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा तो उपयोग करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करीत होता.