रासायनिक बदल व रासायनिक बंध

सहसंयुज बंध

views

2:30
इलेक्ट्रॉन अष्टक/द्विक पूर्ण करण्याची दुसरी पद्धत म्हणजे सहसंयुज बंध होय. तर आता आपण सहसंयुज बंध पद्धतीविषयी माहीती जाणून घेऊया. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या दोन मुलद्रव्यांच्या अणूंचा एकमेकांबरोबर संयोग होतो, तेव्हा जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच सहसंयुज बंध असे म्हणतात. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदानप्रदान होत नाही. त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संदान(sharing) होते. संदान केल्यामुळे दोन्ही अणूंची इलेक्ट्रॉन अष्टक/द्विक स्थिती पूर्ण होते. अणूचे अंतरंग या पाठात आपण पाहिले की, हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे व त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. तसेच हायड्रोजनची संयुजा ही 1 आहे. हायड्रोजनच्या दोन अणूंमध्ये बंध तयार होत असताना दोन्ही अणू हे एकसारखेच असल्यामुळे त्यांच्या एकसारख्या प्रवृत्तीमुळे ते एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनचे संदान घडवून आणतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्या दोघांमध्ये रासायनिक बंध तयार होतो. यावरून एकमेकांबरोबर आपआपले संयुजा इलेक्ट्रॉन संदान केल्यानंतर रासायनिक बंध निर्माण होतो. यालाच सहसंयुज बंध असे म्हणतात.