भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

अर्थव्यवस्था

views

2:42
परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे प्रत्येक देशातील अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे एखादया देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. 1. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात-निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इ. बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. थोडक्यात इतर राष्ट्रांशी संबंध निर्माण केल्याने आपल्या देशाचा फायदा होऊन आपली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हा विचार डोळ्यांपुढे ठेवून परराष्ट्र धोरण ठरविले जाते. आणि 2. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा विचार केला तर राष्ट्राची सुरक्षा जशी महत्त्वाची मानली जाते, तसेच आर्थिक सुरक्षितताही महत्त्वाची मानली जाते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते, तितके एखादे राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि अशा राष्ट्रांना जागतिक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. उदा. अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहेत. राष्ट्रांची अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे इतर देशांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात. मुबलक पैसा उपलब्ध असल्याने ते आवश्यक गोष्टी आयात करू शकतात. तसेच आपल्या राष्ट्राचा विकास घडवू शकतात. ही राष्ट्रे आपले परराष्ट्र धोरण आखताना कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण आखताना देशाची अर्थव्यवस्था महत्वाची मानली जाते.