बाह्यप्रक्रिया भाग – 1

प्रस्तावना

views

3:10
भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळेही भूरूपांची निर्मिती होते, आणि काही भूरूपे नष्टही होतात. ही निर्मिती व ऱ्हासाची प्रक्रिया सतत चालू असते. आपण पाहिले आहे की, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीवर अनेक पठारे व पर्वतांची निर्मिती झाली आहे. तसेच काही बेटे नष्ट झाली आहेत. अंतर्गत हालचालींमुळे जशी भूरूपे तयार होतात, तशीच बाह्यप्रक्रियांमुळेही भूरूपे तयार होतात. त्या भूरूपांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. गुरुत्वीय बल : भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या विविध बलांमुळे बाह्यप्रक्रिया घडून येतात. यात प्रामुख्याने सौरउर्जा, गुरुत्वीय बल आणि पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची महत्वाची भूमिका असते. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी उष्णतेची ऊर्जा. हया तीन ऊर्जामुळे बाह्यप्रक्रिया घडून येतात, व त्यातून भूरूपे तयार होतात. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत गतिजन्य ऊर्जा म्हणजे वाहते पाणी आणि वारा यांची गतिजन्य ऊर्जा होय. अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदा खंड, पर्वत, पठार, मैदाने इत्यादी. बाह्यप्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीयक भूरूपांत बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपे तयार होतात. विदारण म्हणजे खडक फुटणे किंवा कमकुवत होणे. खनन म्हणजे खणले जाण्याची प्रक्रिया. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे तिचा तळ आणि तिचे काठ खणले जातात. वहन म्हणजे मातीचे, रेतीचे कण, दगडाचे बारीक तुकडे वाऱ्याबरोबर किंवा पाण्याबरोबर वाहून जाणे. व संचयन म्हणजे हे तुकडे किंवा वाळूचे कण एखाद्या ठिकाणी साठणे. हया अंतर्गत भूहालचालींमुळे तयार झालेल्या भूरूपावर भूपृष्ठावरील ऊन, वारा, पाऊस यांसारख्या बाह्यकारकांचा मारा होऊन त्यांच्यापासून तृतीयक स्वरुपाची भूरूपे तयार होतात. उदा. मैदानी प्रदेशातून वाऱ्याबरोबर वाहून आलेल्या वाळूमुळे वाळूच्या टेकड्या, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे त्रिभुजप्रदेश तसेच ‘यू’ आकाराची दरी यांसारखी तृतीयक भूरूपे तयार होतात.