कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

प्रस्तावना कुटुंब संख्या

views

5:32
आपण जन्मापासून आपल्या कुटुंबात राहत असतो. आपण आपल्या कुटुंबाचा सदस्य असतो.आपल्या कुटुंबाचे सदस्य जेवढे असतात तेवढेच कायम राहतात असे नाही. तर त्यांची संख्या कमी-जास्त होत असते. त्याची अनेक कारणे आहेत. त्या कारणांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तसेच आपले शेजारीही बदलत असतात. त्याचाही अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. कुटुंबातील माणसांची संख्या काळानुसार वेगवेगळी असू शकते. ही संख्या कायम तशीच स्थिर राहत नाही. त्यात बदल होत असतो. कधी ती कमी तर कधी अधिक होत असते. लग्नामुळे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते.लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्याच्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. तसेच जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होत असतो. नवी पिढी जन्माला येते त्यामुळे कुटुंबाची वाढ होते. तर आजारपण, म्हातारपण, अपघात यांसारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते.कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होण्याचे दुसरे कारण म्हणजे स्थलांतर होय. स्थलांतर म्हणजे आपले राहते ठिकाण सोडून काही कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी दुसऱ्या ठिकाणी जाणे होय. काही वेळा शिक्षणासाठी मुले-मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा, नोकरी व व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. यालाच ‘स्थलांतर करणे’ असे म्हणतात.