आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला

सूर्यमाला व सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू

views

3:39
आतापर्यंत सूर्यमालेतील मुख्य ग्रहांचा आपण अभ्यास केला. पण सूर्यमालेत या ग्रहांव्यतिरिक्त इतरही काही उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह असे आहेत. त्यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. उपग्रह :- ज्या खगोलीय वस्तू ग्रहांभोवती फिरतात, म्हणजेच परिभ्रमण करतात, त्यांना आपण उपग्रह म्हणतो. उपग्रहांना स्वत:चा प्रकाश नसतो. म्हणजेच उपग्रहांनासुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. आकाशातील चंद्र तर तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. हा चंद्र स्वत:भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. म्हणून चंद्राला पृथ्वीचा ‘उपग्रह’ म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाने पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. हे ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती फिरत असतात, म्हणजेच परिभ्रमण करत असतात. उपग्रह हे दोन प्रकारचे असतात. नैसर्गिक उपग्रह जसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र आणि शनीचा उपग्रह टायटन आहे. आणि कृत्रिम उपग्रह उदा. स्पुटनिक १, इन्सॅट हे कृत्रिम उपग्रह मानवाने आकाशात सोडले आहेत. बटुग्रह :- सूर्यमालेत सूर्याभोवती फिरणाऱ्या आणखी काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांनाच ‘बटुग्रह’ असे म्हणतात. प्लुटोसारख्या ग्रहांचा समावेश बटुग्रहात होतो. ‘बटुग्रह’ हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतात. सूर्यमालेमध्ये बटुग्रहाची स्वतःची स्वतंत्र कक्षा असते. आकाशगंगेत प्लुटो, सेरेस, एरिस, हौमिआ व माकीमाकी हे पाच बटुग्रह आहेत. लघुग्रह : लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह होय. सूर्यमालेमध्ये इतर ग्रहांप्रमाणेच लघुग्रह हे सुद्धा महत्वाचे आहेत. मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. परंतु यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. सूर्यमालेमध्ये ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेस काही ग्रह निर्माण होण्यास अडथळा आलेले जे खडकांचे लहान-लहान तुकडे आहेत, ते तुकडे म्हणजेच लघुग्रह होय. लघुग्रह हे देखील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरतात.