आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला

अवकाश प्रक्षेपण तंत्र

views

2:28
ग्रह, तारे यामधील जी रिकामी जागा आहे त्यालाच आपण आवकाश किंवा अंतराळ असे म्हणतो. आपल्याला असा प्रश्न पडतो की मानवाने सूर्यमालेची इतकी माहिती कशी मिळवली असावी? तर पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्या खगोलीय वस्तूंविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. म्हणून त्याविषयीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जावे लागेल. जर आपल्याला एखादी वस्तू अवकाशात पाठवायची असेल तर तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रालाच ‘अवकाश प्रक्षेपण तंत्र’ असे म्हणतात. दिवाळीत जमिनीवरून आकाशाकडे उडणारा रॉकेट नावाचा एक फटाका असतो; तो तुम्ही पाहिला आहे की नाही? या रॉकेटमध्ये विस्फोटक पदार्थ भरलेला असतो. आपण त्याची वात पेटवतो तेव्हा खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे ते आकाशाच्या दिशेने उडते. जर अवकाशातील खगोलीय वस्तूंचा अभ्यास करायचा असेल तर आकाशात जाण्यासाठी शक्तिशाली रॉकेटचा वापर करावा लागतो. त्यालाच आपण अग्निबाण असे म्हणतो. ‘अग्निबाणाचा’ उपयोग आपण अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी करतो. या अग्निबाणामध्ये हजारो टन वजन असलेले अवकाशयान अंतराळात नेण्याची क्षमता असते. यासाठी खूप मोठया प्रमाणात इंधनाची आवश्यकता असते. विसाव्या शतकामध्ये बऱ्याच देशांनी अवकाशयाने अंतराळात पाठवली आहेत. तसेच अवकाशयानांसंबंधी तंत्रज्ञानही विकसित केले आहे. आपला भारत देश तर या अवकाश प्रक्षेपण तंत्राच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. यापैकी काही अवकाशयाने कायमचीच अंतराळात राहतात. तर काही अवकाशयाने पृथ्वीवर परत येतात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकही अवकाशयानातून अंतराळात जात असतात. त्यांपैकी राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स हे अंतराळवीर भारतीय वंशाचे आहेत.