सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

स्वच्छतादूत

views

3:04
‘घराची शोभा अंगणावरून कळते’ अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. तसेच गावाची शोभा ही त्या गावातील रस्ते, मोकळी जागा यांच्या स्वच्छतेवरून कळते. आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी काय-काय केले पाहिजे? गावातील नागरिकांनी, शाळेतील मुलामुलींनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या गावाची स्वच्छता केली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आधी मुळात ते अस्वच्छ होऊच देता कामा नये. कचरा वाटेल तिथे फेकू नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण घरातील कचरा बाहेर फेकून उकिरडे तयार करतो, हे चूक आहे. घर जसे आपले तसेच गावही आपले आहे. आपण सर्वांनी मिळून ते स्वच्छ ठेवले पाहिजे. गाव स्वच्छ असेल तर आपण निरोगी राहू. शाळेमुळे समाजाची प्रगती होते. तसेच गावातील समस्या सोडवण्यातही शाळेचा खूप मोठा सहभाग असतो. गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे, गावातील लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून एका गावातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थी ‘स्वच्छतादूत’ झाले. थुंकू नका, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, अशी ‘घोषणापत्रके’ त्यांनी तयार केली. ती गावात लावली. गावातील गल्ली, वस्त्यांमध्ये पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वच्छतेसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील जनतेपर्यंत पोहचविली. त्यामुळे लोकांच्या मनांमध्ये गावाबद्दल ‘आत्माभिमान’ वाढला व लोक स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला पुढे आले. गावामध्ये एकजूट निर्माण व्हायला मदत झाली. आणि याच गावाला शासनाचा स्वच्छतेसाठी असणारा ‘निर्मलग्राम’ पुरस्कार मिळाला.