आपले घर व पर्यावरण

बेघरपणा व बेघरपणाची कारणे

views

3:41
प्रत्येकाला हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते. परंतु सर्वांच्या या गरजा पूर्ण होतातच असे नाही. आपल्या सभोवताली आपल्याला असे अनेक लोक दिसून येतात की त्यांना राहण्यासाठी घरे नसतात. असे लोक माळरानावर, पदपथावर, पुलाखाली, पडक्या इमारती, रेल्वे स्टेशन, बसस्थानके अशा ठिकाणी राहतात.या लोकांना उपजीविकेचे साधन मिळत नाही किंवा जे साधन त्यांच्याजवळ असते, त्यामध्ये त्यांच्या गरजांची पूर्तता होत नाही. त्यामुळे या लोकांना बेघर राहावे लागते. बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. शासनामार्फत अशा बेघर लोकांना घरे मिळावी म्हणून विविध योजना राबविल्या जातात. यामागे शासनाचा हेतू हा केवळ सर्वांना स्वतःचा निवारा मिळावा हाच असतो. शिवाय मोठमोठ्या शहरांमध्ये शासनामार्फत ‘रात्रनिवारे’ उपलब्ध केले जातात. बेघरपणाची कारणे:- परवडणाऱ्या घरांचा अभाव:- आजच्या महागाईच्या काळात घरे खूप महाग झाली आहेत. आपल्या उत्पन्नात परवडेल असे मालकीचे किंवा भाड्याचेही घर ज्यांना मिळत नाही, त्यांना घराशिवायच दिवस काढण्याची वेळ येते. दारिद्र्य:- दारिद्र्य म्हणजे ‘गरिबी’. दारिद्र्यामुळे लोकांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. दारिद्र्यामुळे जिथे पोट भरणे शक्य होत नाही, तिथे घर मिळवणे ही गोष्ट खूप दूरची आहे. त्यामुळेच दारिद्र्य ही समस्या बेघर पणाचे मुख्य कारण आहे. नैसर्गिक आपत्ती:- भूकंप, दुष्काळ, अशा नैसर्गिक आपत्तींमुळे लोक बेघर होतात. भूकंपामुळे घरे, इमारती कोसळतात. दुष्काळामुळे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत लोक बेघर होतात. अपुरे आर्थिक उत्पन्न:- काही लोकांचे उत्पन्न खूप कमी असते. जे उत्पन्न मिळते त्यामध्ये त्यांची उपजीविकाही होणे कठीण असते. अशा अपुऱ्या आर्थिक उत्पन्नामुळे लोकांना घरे घेता येत नाहीत आणि मग त्यांच्यावर बेघर राहण्याची पाळी येते.बेरोजगारी:- आज आपल्या देशात बेरोजगारांचे प्रमाण खूप आहे. बेरोजगारीमुळे लोकांना स्वतःच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. रोजगाराच्या शोधात स्थलांतर करून लोक शहरात येतात. असे लोक साहजिकच बेघर असतात.