भारताची संसद

राज्यसभा

views

4:28
भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा होय. लोकसभेच्या सदस्यांप्रमाणे या सभागृहातील सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेतून होत नाही. म्हणून राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील २९ घटकराज्ये आणि ७ संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २५० आहे. यांपैकी २३८ सदस्य विविध घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटकराज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळत असते. जसे की, महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटीपर्यंत आहे. तर त्या प्रमाणात महाराष्ट्रातून सदस्य राज्यसभेवर पाठविले जातात. सर्व घटकराज्ये आणि संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधी येऊन उरलेल्या १२ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. उदा. सचिन तेंडूलकर, राजवर्धन राठोड यांसारख्या व्यक्तींची क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तर रेखा, जया भादुरी या अभिनेत्रींची कला या क्षेत्रातील कामाबद्दल राज्यसभेवर नेमणूक केली आहे. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. लोकसभा दर पाच वर्षांनी विसर्जित होते. तर राज्यसभा कधीही संपूर्णपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते स्थायी किंवा कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. म्हणजेच, राज्यसभेचे सर्वच्या सर्व सभासदांचा कार्यकाल कधीही एकदम संपत नाही. दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले १/३ (एक तृतीयांश) सदस्य निवृत्त होतात. आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. प्रत्येक सदस्याचा कार्यकाल ६ वर्षे निश्चित केलेला असतो. टप्याटप्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तसेच तिचे वय ३० वर्षे पूर्ण असले पाहिजे. राज्यसभेत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नाव निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत असले पाहिजे.