आनुवंशिकता व उत्क्रांती

उत्क्रांती

views

3:54
आता आपण उत्क्रांतीविषयी माहिती अभ्यासूया. उत्क्रांतीमध्ये ग्रह, तारे, सजीव अशा घटकांच्या विविध विकासाच्या टप्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच सर्वसामान्यपणे आपण उत्क्रांतीबद्दल असे म्हणू शकतो की, ‘उत्क्रांती’ म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. उत्क्रांतीमुळेच नव्या जीवजाती निर्माण होतात व त्यांचा विकास होत असतो. म्हणून, “नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय’’. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे सजीवांची उत्पत्ती होत असताना पुढीलप्रमाणे टप्पे घडले असावेत असे अनुमान केले जाते. सर्वप्रथम साधी मूलद्रव्ये असावीत. त्यानंतर सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी-साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यानंतर प्रथिने आणि केंद्रकाम्ले अशी सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत. आणि नंतर सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण तयार झाले असावे. निरनिराळ्या सेंद्रिय व असेंद्रीय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ, पेशी तयार झाल्या असाव्यात. याच पेशी आजूबाजूला असणाऱ्या रसायने भक्षण करू लागल्यामुळे त्यांची संख्या वाढली असावी. यातूनच सजीवांची निर्मिती झाली असावी. जे जीव परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट झाले असावेत असा अंदाज आहे. पृथ्वीवर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्या प्रजातींचा आकार तसेच जटीलता यांमध्ये विविधता आहे. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय प्राणी अमिबा, पॅरामेशिययमपासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळून येतो. तर वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून ते वडाच्या झाडापर्यंतचा विस्तार आढळून येतो. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर हवा, पाणी, जमीन, खडक, वाळवंट अशा सर्वच ठिकाणी सजीव आढळून येतात. अशाप्रकारे सजीवांची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. आपण जर विचार केला तर अगदी प्राचीन काळापासून मानवाला अनेक प्रश्न पडले आहेत, तसेच उत्सुकताही लागली आहे की, प्रुथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला असेल? सजीवांमध्ये एवढी विविधता कोठून आली असावी? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने अनेकांनी अभ्यास केला व अनेक उपपत्तीही मांडल्या आहेत. यापैकी ‘सजीवांची उत्क्रांती’ अथवा ‘सजीवांचा क्रमविकास’ हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे