निर्देशक भूमिती

प्रस्तावना

views

04:47
आलेख काढणे, आलेखाचे वाचन कसे करायचे याचा अभ्यास आपण मागील इयत्तेपासून करत आलो आहोत. आज आपण निर्देशक भूमिती म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. निर्देशक भूमिती ही संकल्पना नेमकी काय आहे? हे एका प्रसंगातून समजून घेऊ. एका इमारतीसमोर पटांगणात चिंटू व त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. एक आजोबा तेथे आले. आजोबा: अरे चिंटू दत्ताभाऊ याच सोसायटीत राहतात ना? चिंटू: हो, येथेच राहतात. दुसऱ्या मजल्यावर त्यांचे घर आहे. येथून ती खिडकी दिसते ना, तेथे. आजोबा: अरे, दुसऱ्या मजल्यावर मला पाच खिडक्या दिसत आहेत. नक्की घर कोणते? चिंटू: दुसऱ्या मजल्यावर डावीकडून तिसरी खिडकी त्यांची. या संवादात चिंटूने केलेले दत्ताभाऊंच्या घराच्या स्थानाचे वर्णन म्हणजेच निर्देशक भूमितीतील मूळ संकल्पना आहे. घराचे स्थान नेमके समजण्यासाठी नुसता मजल्याचा क्रमांक सांगून पुरेसा नाही, तर डावीकडून किंवा उजवीकडून कितवे घर हेही सांगावे लागेल. म्हणजे क्रमाने दोन संख्या सांगाव्या लागल्या. जमिनीपासून दुसरा मजला व डावीकडून तिसरी खिडकी. अशा दोन क्रमवाचक संख्या वापराव्या लागल्या. थोडक्यात एखाद्या ठिकाणाचे, वस्तूचे स्थान नेमके कोठे आहे याचा निर्देश करणे म्हणजेच दाखवणे याचा समावेश निर्देशक भूमितीत होतो. सतराव्या शतकातील फ्रेंच गणिती रेने देकार्त यांनी प्रतलातील बिंदूचे स्थान अचूकपणे दर्शविण्यासाठी ‘निर्देशक पद्धती’ सुचवली. या पद्धतीला ‘कार्तेशियन निर्देशक पद्धत’ असे म्हणतात. देकार्त यांच्या नावावरून हे नाव दिले आहे. देकार्त यांनी प्रथमच भूमिती आणि बीजगणित यांमधील सहसंबंध प्रस्थापित केल्यामुळे गणितामध्ये क्रांती घडून आली. कार्तेशियन निर्देशक पद्धती ही विश्लेषक भूमितीचा पाया आहे. ‘ला जॉमेट्रिक’ हे रेने देकार्त यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकात त्यांनी भूमितीच्या अभ्यासासाठी बीजगणिताचा वापर केला होता.