सजीवांचे परस्परांशी नाते

माहित आहे का तुम्हाला?, ऋतूमनाप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल भाग १

views

04:34
आपल्याकडे हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे प्रमुख तीन ऋतू असतात. या ऋतूंप्रमाणे सजीवांमध्ये बदल होत असतात.फेब्रुवारी महिना संपत आला की, थंडी कमी होऊ लागते. मार्च महिना सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. हिवाळा ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ही तांबूस रंगाची असतात. ही पाने वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात. झाडांना पालवी फुटल्याने रानावनांत सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक, कोवळी पाने दिसू लागतात. या काळात कोकीळ पक्ष्याचा मंजुळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिगंडे भरपूर येतात. या फळांचा तो हंगामच असतो. म्हणजे उन्हाळ्यात ही फळे मोठया प्रमाणावर येतात. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पिकणारा हापूस या जातीचा आंबा विदेशातही पाठविला जातो. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. डोंगरउतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग जमू लागतात. पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागते. तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळे आलेली असतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सर्वत्र विखुरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर किंवा कोंब फुटतात. गवत आणि इतर वनस्पती वाढू लागतात. त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे हिरवाई दिसू लागते. ते दृश्य डोळ्यांना गारवा देते. अशातच कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते. हे सर्व वातावरण प्रसन्न व मनमोहक असते. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. कधी कधी बेडूक एका सुरात डराव डराव करत असतात. पावसाळा संपला की पुन्हा हिवाळा ऋतू सुरु होतो. पुन्हा थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो. त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप पुढील सात आठ महिन्यांसाठी असते. म्हणजेच पुढचा पावसाळा येईपर्यंत ते जमिनीखाली असतात. मुलांनो, आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. ऋतुमानानुसार ठरावीक ऋतूत शेतीची ठरावीक कामे केली जातात. उन्हाळ्यात नांगरणी किंवा जमिनीची मशागत पावसाळ्यात पेरणी व हिवाळ्यात पिकाची काढणी केली जाते.