प्रतापगडावरील पराक्रम

अफजलखानाचे डावपेच

views

01:56
शिवराय राजगडावरून प्रतापगडावर गेल्याची बातमी खानाला कळताच खान चिडला. खान बारा वर्षे याच परिसरात असल्याने त्याला माहीत होते की, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नव्हते. कारण प्रतापगड डोंगरात होता. त्याच्या भोवती घनदाट जंगल होते. वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला चढून जाण्यासाठी चांगली वाट नव्हती. तसेच खानाजवळ असलेल्या तोफा चढवायला वाट नव्हती. शिवाय तेथे जंगली जनावरांचा सुळसुळाट होता. अशा परिस्थितीत प्रतापगडावर चाल करून जाणे खानाला अशक्य वाटू लागले. मग त्याने शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे, म्हणून डाव खेळण्यास सुरूवात केली. त्याने तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिराची व पंढरपूरच्या विठठ्लाच्या मंदिरांची तोडफोड केली. तसेच आसपासच्या छोटया-मोठया मंदिरांची तोडफोड करून स्वराज्यातील रयतेचा छळ केला, लोकांची घरे लुटली, पिकांचे नुकसान केले. हे सर्व करण्यामागे त्याचा हेतू हा होता की, हे सर्व ऐकून शिवराय प्रतापगड सोडतील आणि प्रतिकार करायला गडाबाहेर येतील. परंतु, शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही, तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. नुकसान करूनही शिवराय ऐकत नाहीत म्हटल्यावर त्याने प्रेमळपणाचे सोंग घेऊन शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हांला मी आदिलशाहाकडून सरदारकी देतो. अफजल खानास वाटले की सरदारकीची आशा दाखविल्याने शिवाजी आपल्याकडे येईल. आपल्याला शरण येईल. परंतु तसेही झाले नाही.