प्रतापगडावरील पराक्रम

अफजलखानाशी झटापट

views

02:44
खानाने शिवरायांपुढे भेटीसाठी हात पसरले तसे शिवराय सावध झाले. सावधानतेने ते पुढे झाले. खानाने शिवरायांना मिठी मारली. धिप्पाड, शरीराने उंच व दणकट खानापुढे शिवराय ठेंगणे होते, उंचीने कमी होते. शिवरायांचे डोके खानाच्या छातीवर आले. त्याबरोबर लगेच खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या काखेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. खानाने केलेल्या कट्यारीच्या वाराने शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत होते म्हणून शिवराय वाचले. मुलांनो, विचार करा, शिवरायांनी जर पुढचा विचार न करता, बेसावधपणे खानाची भेट घेतली असती तर शिवाजी महाराजांचा शेवट त्याच भेटीत झाला असता. मग कसले स्वराज्य आणि कसले सुराज्य, ही सर्व स्वप्ने बनून राहिली असती. पण सावधगिरीने विचार केल्यामुळे शिवराय वाचले. त्यांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसली. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. शिवरायांच्या एकावर एक मा-यामुळे खान कोसळला. एवढयात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा जीवघेणा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका धावात त्याला ठार केले. शामियान्यात चाललेल्या हालचालींचा व तलवारींचा आवाज ऐकून खानाचा शिपाई बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार, एवढयात शिवरायांचा निष्ठावंत मावळा जिवाजी महाला धावून आला. शिवरायांच्यावरचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले. जिवा महालचा हा पराक्रम सांगणारी म्हणच पुढे पडली: ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’. जिवा महालाने जर बडा सय्यदचा तो घाव स्वत:वर घेतला नसता तर त्यातच शिवरायांचे काही बरे – वाईट झाले असते. त्यावेळी झालेल्या संघर्षात शिवरायांच्या दुसऱ्या एका मावळ्याने, संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला.