प्रतापगडावरील पराक्रम

अफजलखानाच्या फौजेची दाणादाण

views

01:56
खानाला यमाच्या घरी पाठवून शिवराय प्रतापगडाच्या पायथ्यावरून गडावर गेले. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांनी गडावरून इशाऱ्याची तोफ दिली. जंगलात, डोंगरात, द-यांत लपून बसलेले शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफेचा इशारा मिळताच त्यांना कळले शिवरायांनी खानाला संपवले व शिवराय सुखरूप आहेत. त्यांच्या अंगात उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले. एवढा वेळ दबा धरून बसलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना कळेनासे झाले की काय होत आहे ते! त्यांची पळता भुई थोडी झाली. त्यांना पळून जायलाही वाट सापडेना. मराठयांनी पळून जाणाऱ्या खानाच्या फौजेचा वाऱ्यासारखा वेगाने पाठलाग केला आणि त्यांचा धुव्वा उडवला. दिसेल त्याला मराठा सैन्य मारत, कापत सुटले. यातून अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा वाचला व विजापुरला जाऊन पोहोचला. त्याने प्रतापगडावर घडलेली सर्व हकीकत विजापुरात जाऊन सांगितली. खानाच्या वधाची बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. विजापूरात प्रत्येकाच्या तोंडी फक्त शिवाजींच्या पराक्रमाचे किस्से होते. विजापूरचा सर्वात बलाढय सरदार शिवरायांनी गारद केला होता. त्यामुळे शिवरायांचे नाव स्वराज्यात व स्वराज्याबाहेरही मोठया आदराने घेतले जाऊ लागले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सहयाद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले. मुलांनो अशा तऱ्हेने शिवरायांनी स्वराज्यावर आलेले संकट दूर करून स्वत:च्या पराक्रमाची झलक आपल्या शत्रूंना दाखवून दिली.