नियम सर्वांसाठी

चुकीच्या रूढी - परंपरा

views

2:26
आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचेही पालन करत असतो. आपले आई-वडील, आजी-आजोबा नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण-समारंभाचा एकत्रित आनंद घेतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. प्राण्यांविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. असे असले तरी, काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य असतात. त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ जातिभेद. जातीवरून आपल्या समाजामध्ये माणसा माणसांत भेदभाव केला जातो. त्यामुळे उच्च-नीच अशी दरी निर्माण होते. विषमता वाढते. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. परंतु स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. अशा प्रकारे अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा कायदा करून नष्ट करण्यात आल्या. आपल्या देशात सती, बालविवाह यांसारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्याचे काम होत होते. या जादूटोणा करण्यावर बंदी घालून त्याच्याविरुद्ध कायदा करण्यात आला. हा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे.