गड आला, पण सिंह गेला

गड आला, पण सिंह गेला

views

3:05
लढाईत आपल्या सरदाराला किंवा प्रमुख नेत्याला महत्त्वाचे मानले जाते. जोपर्यंत प्रमुख किंवा सरदार उभा असेल किंवा लढत असतो, तोपर्यंत त्याचे सैन्य लढत राहते. पण जर का सरदारच पडला तर सैन्याचा धीर खचून जातो. तेच इथे तानाजींच्या मावळयांच्या बाबतीतही घडले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला, ते घाबरले, इकडे-तिकडे पळू लागले. आपला सरदार पडला आता आपण काय करणार? आपले काही खरे नाही, असे त्यांना वाटू लागले. इतक्यात तानाजींचा भाऊ सूर्याजी व त्यांचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहचले. सूर्याजीने पाहिले तर समोर त्याला आपला भाऊ मृत्युमुखी पडलेला दिसला. तानाजीला पडलेला पाहून सूर्याजीला अतिशय दु:ख झाले. पण ही वेळ दु:ख करण्याची नव्हती, तर लढण्याची होती. त्याने दु:खाला मागे सारले. सैरावैरा जीव वाचवून पळणारे मावळे त्याने पाहिले. सूर्याजीच्या हे लक्षात येताच त्यांनी कडयावरून खाली जाणारा आधाराचा दोरच कापून टाकला. पळणाऱ्या मावळयांना तो आडवा गेला आणि म्हणाला, “अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे घाबरून भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी कडयावरचा दोर कापून टाकला आहे आता तुम्ही एक तर कडयावरून उडया टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.” सूर्याजीच्या या बोलण्याने मावळयांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले. पळणारे मावळे मागे फिरले. ते उदेभानाच्या सैन्यावर तुटून पडले. शेलारमामा व सूर्याजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी गड ताब्यात घेतला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला आपण जिंकला, हा इशारा शिवरायांना राजगडापर्यंत पोहचविण्यात आला. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली. गड ताब्यात घेतला पण त्यासाठी तानाजी मालुसरेसारखा शूर, पराक्रमी मावळा स्वराज्याला कायमचा गमवावा लागला. तानाजीचे लढाईत प्राण गेल्याचे कळताच जिजामाता व शिवरायांना खूप दु:ख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. तानाजीची किंमत काय होती हे महाराजांना चांगलेच माहीत होते. शिवराय खूप दु:खी झाले आणि म्हणाले “गड आला, पण सिंह गेला!”. महाराजांनी कोंढाणा गडाचे नाव बदलून त्यास सिंहगड असे नाव दिले.