शिवरायांचे शिक्षण

दादाजी कोंडदेवांची कामगिरी, शिवरायांचे शिक्षण

views

3:27
जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागीरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदार होते. शहाजीराजांनी कोंढाण्याचा कारभार पाहण्यासाठी दादाजी कोंडदेव यांना नियुक्त केले होते. ते फार प्रामाणिक सेवक होते. ते अत्यंत चोख कारभार करत. तसेच ते न्यायाला धरून वागणारे होते. त्यांची शिस्त कडक होती. ते शहाजीराजांशी निष्ठा बाळगून होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतांत पिके घ्यावीत, बरीच वर्षे पडीक असलेली जमीन पुन्हा लागवडीखाली यावी म्हणून दादाजींनी शेतकऱ्याना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. शेतसारा म्हणजे सरकारी व्यवस्थेला द्यावा लागणारा एक प्रकारचा कर होय. उदा. आपण जसे पाणीपट्टी, वीजपट्टी ग्रामपंचायतीला पैशांच्या स्वरुपात देतो तसेच.शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. जंगल वाढल्यामुळे त्याठिकाणी लांडग्यांची संख्याही वाढली होती. हे लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, या लांडग्यांचा त्रास कमी करण्यासाठी दादाजींनी बक्षिसे जाहीर केली. बक्षिसाच्या मोहापायी लोक लांडग्यांना शोधून – शोधून मारू लागले. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. पुण्यात चोरी, लूट यांसारख्या गोष्टींचे प्रमाण वाढले होते. यासाठी उपाय म्हणून दादाजींनी माणसांना एकत्र करून त्यांची पथके उभारली, आणि त्यांचा पहारा बसवला. त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा म्हणजे कर आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. शिवराय हे कर्नाटकातून पुणे जहागिरीत आले, शहाजी राजांपासून लांब असले तरी त्यांचे शिक्षण बंद झाले नव्हते. जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच होते. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या.