शिवरायांचे शिक्षण

शिवरायांचा नवा अंमल, शिवरायांचा विवाह

views

2:49
अंमल म्हणजे कारभार पाहणे होय. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी कर्नाटकातून शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी जिजाऊ व शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हणमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे, सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मोठी व त्यांच्या क्षेत्रातील अतिशय हुशार अशी मंडळी बरोबर दिली होती. यातील कोणी युद्धकलेत हुशार होता, कोणी राजनीतीत तर कोणी राज्यकारभार कसा करावा यात हुशार होते. त्यामुळे असे वाटत होते, की शिवरायांच्या राज्यातील हे अधिकारीच आहेत. शिवराय वयाने लहान असतानाच त्यांच्यावर पुणे जहागिरीची जबाबदारी आली. त्यांना आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पार पाडताना अडचणी येऊ नयेत म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी शिवबांबरोबर पुण्यास पाठविले. त्यांच्या मदतीने शिवराय पुणे जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय, जुलूम करणाऱ्या लोकांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचे रूपच बदलत होते. पुढे होणाऱ्या स्वराज्यात कशा प्रकारे व्यवस्था असेल याचा छोटासा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. शिवरायांची ही व्यवस्था म्हणजे स्वराज्याच्या सूर्याचा उदय होता. शिवाजी महाराजांच्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती, तेव्हा जिजामाता म्हणाल्या, ‘’ आता शिवबांचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत’’ म्हणजेच त्यांचा विवाह करायला पाहिजे. म्हणून त्यांनी शिवबांकरिता मुली पाहणे सुरू केले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. ती साताऱ्या जवळच्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होती. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे त्यांचे बंधू होते. शिवरायांचा आणि सईबाईंचा विवाह इ.स. १६४० मध्ये मोठया थाटामाटात झाला. वयाच्या दहाव्या वर्षी शिवाजी महाराजांचा विवाह झाला.