शिवरायांचे शिक्षण

वीरमाता जिजाबाईंची शिवरायांना शिकवण

views

5:04
जिजाबाई या काही सामान्य स्त्री नव्हत्या. त्या लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होत्या. राजकारण व युद्धनीतीचे धडे त्यांना अतिशय लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले घराण्याची लढाऊ व पराक्रमाची परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. वडिलांच्या घरी जसे वातावरण होते तसेच वातावरण त्यांना सासरीही लाभले होते. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. त्यांना लाचारीचे व गुलामीचे जगणे आवडत नसे. मराठा सरदाराने कितीही मोठा पराक्रम केला तरी त्याला जराही किंमत सुलतानांच्या दरबारात मिळत नसे. किंवा मराठा सरदारांचा योग्य तो सन्मान राखला जात नसे. याचा वाईट अनुभव त्यांना स्वत:ला आला होता. त्यांच्या पित्याची म्हणजे लखुजी जाधवांची भर दरबारात निजामशाहाने हत्या केली होती. एवढा पराक्रमी व एकनिष्ठ सरदार असूनही निजामाने त्यांना मारले होते. त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून त्यांनी अनेक लढाया लढल्या होत्या. तरीही त्यांची हत्या करण्यात आली. पित्याच्या मृत्यूचे दुख: जिजाबाईंनी पचवले होते. त्यांनी ठरविले होते की, त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वत:च आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण करील. हाच विचार डोळ्यापुढे ठेवून त्या शिवरायांना घडवत होत्या.